उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘लग्न आणि बरंच काही’चे मंत्रालयात पोस्टर अनावरण; स्त्रीच्या दृष्टिकोनातून उलगडणार नवी कथा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण आणि वेगळ्या विषयांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, स्त्रीच्या भावविश्वासोबतच लग्नानंतरच्या आयुष्यातील बदलते नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रवास मांडणाऱ्या ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे आज मंत्रालयात अनावरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण झाले. या अनावरणामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘लग्न आणि बरंच काही’च्या आशयाची आणि त्यामागील महिला नेतृत्वाची चर्चा रंगू लागली आहे.

म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले आहे. पोस्टरचे अनावरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चित्रपटाच्या विषयाचे कौतुक केले. मुलीच्या जन्मापासून बालपण, तारुण्य आणि पुढील आयुष्यापर्यंतच्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून, आजी, आई, सध्याची पिढी आणि पुढील पिढी अशा तीन पिढ्यांतील महिलांना हा विषय जोडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच चित्रपटातून महिलांसोबत पुरुषांनाही नातेसंबंध आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

‘लग्न’ या एका घटनेपलीकडे स्त्रीच्या आयुष्यात सुरू होणारा नवा प्रवास, बदलती नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या स्वप्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या चित्रपटातून संवेदनशीलपणे मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पडद्यामागील निर्मितीतही महिलांचा मोठा सहभाग आहे. संगीत वैशाली सामंत, छायाचित्रण स्मिता निर्मळ, संकलन भक्ती मायाळू, संवाद शर्वरी पेटकर, कथा यशश्री मसूरकर, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी, मीडिया दिग्दर्शन प्रज्ञा सुमती, डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर, पब्लिसिटी डिसाईन प्राजक्ता डोंगरे यांनी चित्रपटाच्या विविध विभागांची धुरा सांभाळली आहे. तसेच अभिनेत्री पूजा सावंत आणि अक्षया नाईक यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

पोस्टर अनावरणानंतर ‘लग्न आणि बरंच काही’च्या कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून लग्न, नाती, आकांक्षा आणि आयुष्याकडे पाहणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याच्या पुढील अपडेट्सकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळख; 'नागरिक सोशल फाउंडेशन'तर्फे 'आदर्श मंदिर स्पर्धा २०२६'चे आयोजन

ग्लॅम डॉक' चॅरिटी फॅशन शो मध्ये डॉक्टर्स कडून महिला आरोग्य विषयक जनजागृती