विधीवेध २०२६ : घटनात्मक व्यासपीठावर रंगला ऐतिहासिक संवाद
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे येथील मूट कोर्ट सोसायटीतर्फे आयोजित “विधीवेध २०२६” हा विचारप्रवर्तक आणि कायदेविषयक कार्यक्रम २ एप्रिल २०२६ रोजी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथील अॅम्फीथिएटरमध्ये उत्साहात पार पडला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था १८८४ पासून शिक्षणाच्या माध्यमातून बौद्धिक सामर्थ्य आणि राष्ट्रभक्ती जोपासण्याचे कार्य करत आहे. संस्थेच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाने गेल्या २१ वर्षांत नवोन्मेषी अध्यापन पद्धती, अभिरूप न्यायालय स्पर्धा, लीगल एड उपक्रम आणि संशोधनाच्या माध्यमातून विधी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना “Religion vs Rights – Before the Nation Hears It” या विषयावर आधारित होती. सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मस्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार यांमधील संघर्षाचे विश्लेषण अभिरूप सुनावणी (Mock Hearing) या स्वरूपात प्रभावीपणे सादर करण्यात आले.
या अभिरूप सुनावणीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अधिवक्त्यांच्या भूमिकेतून दोन्ही बाजूंचे कायदेशीर मुद्दे आणि युक्तिवाद प्रभावीपणे मांडले. घटनात्मक कायद्यातील तज्ज्ञ न्यायमूर्तींच्या पॅनेलसमोर ही सुनावणी पार पडली असून त्यांनी विषयावर सखोल मार्गदर्शन व निरीक्षण नोंदवले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र अहवाल लेखन पॅनेलने या चर्चेतील मुद्दे, कायदेशीर मांडणी आणि निष्कर्ष यांचे सविस्तर दस्तऐवजीकरण केले. हा अहवाल पुढे सर्वोच्च न्यायालय तसेच विधिमंडळाकडे धोरणात्मक विचारासाठी पाठविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद रावत, उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे सी.डी.सी. चेअरमन ॲड. अशोक पलांडे तसेच प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.
या कार्यक्रमाला कार्यरत अधिवक्ते, वरिष्ठ वकील, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या, तसेच कायदा व इतर शाखांतील विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment