उपेक्षितांच्या उद् गारांचा प्रवाह शाहीर पाटसकरांनी अधिक व्यापक केला: राज काझी
"सत्तरीच्या दशकात प्रस्थापित चौकट मोडत दलीत साहित्याची चळवळ अत्यंत जोरकसपणे उसळून आली. जगभराचे लक्ष वेधून घेणारी अनेक दलीत आत्मचरित्र पाठोपाठ प्रसिद्ध होत गेली. उपेक्षितांच्या उद् गारांचा हा प्रवाह शाहीर पाटसकरांच्या आत्मकथनाने अधिक व्यापक केला. मागासवर्गीय परीघ ओलांडत बलुत्या कुंभार समाजाचे दुःखही त्यांनी जगापुढं आणलं“ असे मत लेखक, समीक्षक राज काझी यांनी
शा. बाळ पाटसकर यांच्या 'चाकदांड्या’ या आत्मचरित्राच्या पुनर्प्रकाशनावेळी मांडले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून समाजाचा क्रांतीस्वर बनलेल्या मराठी शाहिरी परंपरेतले एक अग्रणी शाहीर बाळ पाटसकर यांच्या आत्मचरित्राचे नुकतेच पुनर्प्रकाशन करण्यात आले. प्रथम १९९२ साली प्रकाशित झालेले हे गाजलेले आत्मकथन सध्या दुर्मिळ झाले होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सतीश दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात राज काझी यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडले. चंद्रकला प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
"कामगार चळवळ आणि वर्गीय संघर्षाची पार्श्वभूमी असलेली तत्कालीन शाहिरी परंपरा विशिष्ट धर्म वा जातींशी बांधली न राहता थेट माणूसपणाचा पुरस्कार करणारी होती. आपल्या कुंभार समाजाची सामाजिक स्थिती रेखाटत गावकुसा बाहेरील बहिष्कृतांबरोबरच गावकुसातील बलुत्यांच्या विपन्नतेचं चित्रणही पाटसकरांनी आपल्या आत्मकथनात केलं. बलुतेदारी झुगारून नव्या पिढीनं शिक्षणाची वाट धरावी, हे आवाहनही तळमळीनं त्यांनी या पुस्तकात शेवटी केलं आहे“ असेही राज काझी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
स्वच्छ व आदर्शवत राजकारण केलेल्या दौंडचे दिवंगत स्वातंत्र्य सैनिक, आमदार जगन्नाथ पाटसकर या बाळ पाटसकर यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या घराच्या जागेचा अनेक वर्ष सरकार दरबारी रखडलेल्या प्रश्नाचा पाठ पुरावा करण्याचे आश्वासन सतीश दरेकर यांनी या वेळी दिले.
शशिकांत कुंभार (पळसदेवकर) यांनी या आत्मकथनाच्या पुनर्प्रकाशनाची कल्पना मांडली, जी प्रकाशिका शशिकला उपाध्ये यांनी प्रत्यक्षात आणली या विषयीची कृतज्ञता पाटसकर कुटुंबियांनी समारंभात व्यक्त केली.
ज्येष्ठ लेखिका श्रीमती शशिकला कुंभार, शाहीर हेमंत मावळे, उद्योजक नितीन भागवत, कुंभार समाजोन्नती मंडळ मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार, शाहिरांचे जावई भरत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात सुजित रणदिवे, सदाशिव भिसे या शाहिरांसह
शिवमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उमाप, युवा उद्योजक रोहन कुंभार, कवयित्री स्वाती कुंभार सासवडकर, पुणे महानगर पालिकेच्या कर विभागात कार्यरत अधिकारी वंदना पाटसकर या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक दिवंगत आमदार जगन्नाथ पाटसकर यांचे पुत्र हरीभाऊ पाटसकर यांचाही कृतज्ञता सन्मान करण्यात आला.
शाहिरांच्या कन्या अलका कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले. मेधा पाटसकर पाटील यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्र संचालन प्रदीप पाटसकर यांनी केले.
या सोहळ्यासाठी रमेश जिंतीकर, लक्ष्मण कुंभार लोणकर, वृषाली कुंभार, अर्जुन शेगर, दिलीप ओगले, गोविंद भोंगळे, मधुकर कुंभार, दत्ता बावधनकर, नारायण कुंभार, अनिल शिंदे, वसुदेव भुजबळ, हनुमंत कांबळे, सागर पाटसकर, माऊली कुंभार, चंद्रकांत कुंभार आदी कराड, दौंड, बारामती, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पाटसकर कुटुंबाचे नाते संबंधित उपस्थित होते.
#
"चाकदांड्या"च्या नव्या आवृत्तीची प्रत मिळण्यासाठी श्रीमती मंगला पाटसकर, गोविंद स्मृती अपार्टमेंट, सदाशिव पेठ, फडके हॉलसमोर पुणे येथे प्रत्यक्ष अगर प्रदीप पाटसकर (९९२२२९७९३३) किंवा शशिकांत कुंभार पळसदेवकर (९४०३०७८७५२) यांच्याशी फोनवर संपर्क साधावा असे आवाहन संबंधितांनी यांनी केले आहे.
•••
Comments
Post a Comment