तेरावा गोवा लघुपट महोत्सव उत्साहात साजरा
तेराव्या गोवा लघुपट महोत्सवात महाराष्ट्रातील ऊस कामगारांचे विदारक वास्तव दाखवणारा कुस हा लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला, तर शहरी जीवनातील बदलते स्वरूप सर्जनशील स्वरूपात मांडणारा द ट्रॅप या लघुपटासाठी रामकुमार शेडगे यांना प्रायोगिक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.
अक्षय व्यवहारे दिग्दर्शित मिटर डाऊन हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर तिसऱ्या या लघुपटासाठी श्रेयस लाड यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले . पंकी या लघुपटासाठी राहुल राठोड यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून गौरविण्यात आले.
मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे पुण्यातील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन सभागृहामध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . जेष्ठ संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ लेखक मनोहर सप्रे, विनायक कुलकर्णी, यांच्या ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद चैनी यांच्या हस्ते महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय विभागामध्ये जेम्स उगस दिग्दर्शित द नमो फुगे लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर डिस्टन्स वॉटर्स या लघुपटासाठी स्टील ब्युटी यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आणि द लास्ट डेट या लघुपटासाठी रासकी निवरा यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पटकथा लेखक म्हणून पारितोषिक मिळाले. भारतीय विभागामध्ये माय बिलवड मुक्कू हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला तर भारत पाटील यांना अनुबौंड साऊंड या लघुपाठासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. योगायोग या लघुपाठासाठी हर्षल अल्पे यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले . कुस या लघुपटासाठी ज्ञानेश्वर जाधवर यांना सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा लेखक म्हणून पारितोषिक देण्यात आले. निर्वात या लघुपटला सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मिती म्हणून पारितोषिक देण्यात आले. माहितीपट विभागामध्ये व्हाईट गोल्ड हा माहितीपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर मुंबई वारली या लघुपटासाठी निनाद भटकर यांना सर्वोत्कृष्ट माहितीपट दिग्दर्शक म्हणून पारितोषिक देण्यात आले . अभिनय क्षेत्रामध्ये मुकेश जाधव यांना तिसऱ्या या लघुपाटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता , तर अंजली कसबे यांना पंकी या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मे खेलुंगा या लघुकथासाठी रेयान आझाद याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले
Comments
Post a Comment