प्रहार’च्या कलाकारांशी डीपीजीयू आणि डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त संवाद

पुणे, ९ ऑक्टोबर २०२६ : ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (डीपीजीयू), डॉ. डी. वाय. पाटील गृप, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या वतीने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात आगामी ‘प्रहार’ चित्रपटाच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी कलाकारांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील अनुभव, प्रत्यक्ष जीवनातील कथेला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, प्रामाणिकपणा आणि समर्पण याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी कलाकारांना विविध प्रश्न विचारले. कलाकारांनी विनोदी आणि उत्स्फूर्त शैलीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी कलाकारांसोबत सेल्फी तसेच समूह छायाचित्रे काढून या संस्मरणीय भेटीचा आनंद घेतला. विद्यापीठाच्या प्रतिनिधींच्या वतीने पाहुण्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप कलाकार, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या समूह छायाचित्राने झाला.

या भेटीबाबत ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापिठाचे प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पी. पाटील म्हणाले, “राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचे आमच्या कॅम्पसमध्ये स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्या क्षेत्रात मेहनतीने यश मिळवलेल्या व्यक्तींशी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकांमधूनच नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींकडूनही शिकावे, हा आमचा प्रयत्न असतो. ‘प्रहार’च्या कलाकारांशी झालेला हा संवाद त्याचे उत्तम उदाहरण आहे.”

ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिणी एस. पाटील म्हणाल्या, “आमचे विद्यार्थी या संवादासाठी किती उत्सुक आणि जिज्ञासू होते, हे पाहणे आनंददायी होते. अशा संवादांमुळे तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक उद्देशपूर्ण पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना वेळ दिल्याबद्दल ‘प्रहार’च्या संपूर्ण टीमचे आम्ही आभार मानतो आणि चित्रपटाला शुभेच्छा देतो.”

दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाखाली आणि दिनेश विजन यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेला ‘प्रहार’ हा मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असून, हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

डीपीजीयू आणि डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या वतीने विविध क्षेत्रांतील नेते, कलाकार आणि व्यावसायिकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी नियमितपणे आमंत्रित केले जाते. वर्गातील शिक्षणासोबतच प्रत्यक्ष जगातील अनुभव, विचार आणि प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी विद्यापीठ सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळख; 'नागरिक सोशल फाउंडेशन'तर्फे 'आदर्श मंदिर स्पर्धा २०२६'चे आयोजन

महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या विनम्र कुटुंबातील 18 नवदांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुण्यधाम आश्रमात आनंदात संपन्न।

शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात