महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा सामाजिक चित्रपट असून, पॅालिटिकल प्रपोगंडा नाही - दिग्दर्शक स्वरूप सावंतगरज भासल्यास कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ; चित्रपट ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार!
चित्रपटांचे काम केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे इतकेच नसते. समाजात घडणाऱ्या घटनांचा वेध घेत, समाजाला आरसा दाखवत योग्य मार्गदर्शन करण्याचे कामही आजवर अनेक चित्रपटांनी केले आहे. अशा चित्रपटांना विरोध न करता त्याकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची महाराष्ट्राची मौलिक विचारधारा आहे. आशयघन चित्रपटांची महान परंपरा लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीच्या वैचारीक प्रवाहाशी एकरूप होणारा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा सामाजिक चित्रपटही हाच वसा जोपासत समाजातील काही ज्वलंत मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या वाटेवर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राने नेहमीच कलेला अनन्यसाधारण महत्त्व देत मानसन्मानही दिला आहे. असे असताना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या प्रयत्नांना चोख उत्तर देण्यासाठी आणि पूर्ण सत्य सांगून आपली बाजू मांडण्यासाठी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाच्या टिमने मंगळवारी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल'बाबतची सविस्तर माहिती देत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, निर्माते देवेंद्र भट, कथालेखक सागर जैन, कथा-पटकथा लेखक - संजय नवगिरे आदी मंडळी उपस्थित होती. 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हील झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून या चित्रपटाला विरोध होऊ लागला. दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लुक सादर झाल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला. कायदेशीर नोटीस पाठवून चित्रपटाचे काम थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पत्रकार परिषदेत व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे
दिपाली सय्यद म्हणाल्या की, आमच्यावर २५ कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आला आहे. हा दावा करणाऱ्या व्यक्तीवर मला हसू येत आहे. कारण हा चित्रपट कोणाचाही जीवनपट नाही. इथे कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा वापर केलेला नाही. हा चित्रपट केवळ महाराष्ट्रामध्ये झालेल्या भोंदूगिरीवर आधारलेला आहे. या भोंदूगिरीला फसून कित्येक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यावर या चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अशा चित्रपटाच्या निर्मितीत व्यत्यय आणणे चुकीचे असल्याचेही दिपाली म्हणाल्या.
चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत या प्रकरणावर प्रकाश टाकत म्हणाले की, माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मानहानीचा दावा केल्याची नोटीस पाठवली आहे, पण या चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही. सामाजिक प्रबोधन करणाऱ्या या चित्रपटात कोणाचीही मानहानी करण्याचा हेतू नाही. आम्ही कलाकार असल्याने कायम समाजाला संदेश देण्याचे काम करतो. यापूर्वीच्याही चित्रपटांद्वारे आम्ही समाजाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या सिनेमाद्वारे महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्रातील भोंदूगिरीवर भाष्य करीत आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत असून, कितीही नोटिसी आल्या तरी आमचा सिनेमा २ ऑक्टोबरला सिनेमागृहात शंभर टक्के प्रदर्शित होईल याची खात्रीही देतो.
निर्माते देवेंद्र भट म्हणाले की, भोंदूबाबांनी केलेली महिलांची फसवणूक संपूर्ण भारतासमोर आली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आर्थिक दृष्ट्या आम्ही चित्रपट बनविण्यास सक्षम आहोत, पण आता जनता जनार्दनाचा पाठींबा गरजेचा आहे. आता प्रेक्षकांनीच या चित्रपटासाठी आपले मत नोंदवावे आणि 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'सोबत उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
कथालेखक सागर जैन यांनी सांगितले कि सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखाही काल्पनिक आहेत. यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. मनोरंजनासोबतच प्रबोधन करताना अंधश्रद्धेवर प्रहार करीत महाराष्ट्रातील तथाकथित भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट करणार असल्याचे सांगितले.
पटकथा-संवाद लेखक संजय नवगिरे यांनी सांगितले कि समाजात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वाईट घटना आहेत त्यावर भाष्य करण्याचा सर्वांना अधिकार असतो, कर्तव्य असतो, जबाबदारी असते, त्यामुळे असे सिनेमे येतात तेव्हा सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही.
Comments
Post a Comment