सतीश शहा काळाच्या पडद्याआड !
ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा (वय ७४) यांचे आज मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. 'जाने भी दो यारो', 'हम आप के है कौन', 'कभी हा कभी ना', 'दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे..... हे त्यांचे गाजलेले चित्रपट. 'ये जो है जिंदगी' या मालिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' ही त्यांची गाजलेली मालिका.
भारतात दूरदर्शन मालिकांची पायाभरणी ज्यांनी केली त्यात सतिश शाह हे नाव पण अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जसपाल भट्टी, जावेद जाफरी, सतीश शाह ही मंडळी तेव्हा त्यांच्या हलक्या फुलक्या विनोदातून आपल्याला हसवत असायची.
"यह जो है जिंदगी, फिल्मी चक्कर, घरजमाई, ऑल द बेस्ट" ह्या त्याच्या मालिकांनी एक काळ अक्षरशः गाजवला होता. 'हमारे पीए साहब' म्हणून एक मालिकापण लागायची, ती किती जणांना आठवते कल्पना नाही.
त्या काळात मराठी/गुजराती रंगभूमीवरचे अनेक कलावंत DD1,DD मेट्रो,नव्यानेच सुरू झालेले झी टीव्ही,सोनी टीव्ही गाजवत असत.
चित्रपटाच्या बाबतीत पण सतीश शाहची कारकिर्द समृद्ध आहे.
'अरविंद देसाई की अजीब दास्तान' पासून सुरू झालेल्या त्याच्या कारकिर्दीत गमन, उमराव जान, शक्ती, अर्धसत्य पासून DDLJ, हम आपके है कौन, हम साथ साथ है, कल हो ना हो सारख्या तगड्या नावांचा समावेश आहे. असे थोडेथोडके नव्हे तर 250 चित्रपट त्याच्या नावावर जमा आहे.
जितेंद्रच्या 'हातीमताई' सारख्या फॅन्टसी सिनेमात केलेली धमाल असो किंवा 'वीराना, पुराना मंदिर' सारख्या रामसे बंधूच्या भयपटातल्या रहस्यमय भूमिका, सतिश शाहने स्वतःची छाप सोडली नाही असं कधी झालं नाही.
'साथीया'मध्ये मुलाच स्थळ घेऊन गेल्यावर शरत सक्सेनाशी कुत्सितपणे बोलण्याचा सीन आठवून बघा, त्याची भूमिका थोडी ग्रे शेड असली तरी परिणाम करून जाते.
'फिरभी दिल है हिंदुस्थानी' मधला टीव्ही चॅनलचा मालक सुद्धा तसाच !!
विनोदी भूमिकेच्या पण विविध छटा कशा दाखवाव्या हे शिकावं तर सतीश शाहकडून !
फॅन्टसी, भीतीदायक, कुजकट, खलनायकी, द्वयर्थी अशा कोणत्याही प्रकारच्या विनोदातल त्याच टायमिंग मजेदार असत.
'जानेभी दो यारो' सारख्या ब्लॅक कॉमेडीमध्ये तर त्याने साकारलेल्या कमिशनर डिमेलोची 'डेड बॉडी' सुद्धा खदखदून हसवून जाते. त्यातला क्लायमॅक्सचा महाभारत सीन म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
नंतरच्या काळात 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधला इंद्रवदन आणि त्याच्या कुटुंबाची धमालमस्ती म्हणजे गत कित्येक वर्षातली अपवादात्मक निखळ आनंददायी मालिका होती.
सतिश शाहने काही मराठी चित्रपट पण केले. "वाजवा रे वाजवा" मध्ये तर थेट अशोक सराफसोबत जुगलबंदी होती.
तर पु.लं.च्या साहित्यावर आधारित असलेल्या गोळाबेरीज मध्ये पेस्टनकाकांची छोटी भूमिका पण त्याने केली.
Comments
Post a Comment