डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान
मानवी पिढ्यांना सर्वार्थाने सक्षम आणि प्रगत करण्यासाठी अत्याधुनिक शिक्षणाबरोबर चांगले संस्कार, सद्भावना, सदाचार, सद्विचार आवश्यक आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी शिक्षणाबरोबर या सर्व बाबींनी युक्त विद्यार्थी घडविण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून देशभरात विद्येचे प्रसारक कार्य हाती घेतलेले एमआयटीचे कुलपती डॉ. विश्वनाथ कराड यांना महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने चौथा "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार" स्वामीजींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याच प्रमाणे तरुण वयात इतिहास संशोधनाचा बाबासाहेबांचा वसा समर्थपणे पुढे चालवणारे डॉ. केदार फाळके यांना आदरणीय बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावे दिली जाणारी "श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती" प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बाबासाहेबांचे पुत्र अमृत पुरंदरे, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, अभिषेक जाधव, विशाल सातव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
"सध्याच्या काळात जगभरात आणि भारतातही व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैश्विक पातळीवर मानवाची परिस्थिती उद्विग्न करणारी आहे. कारण केवळ शिक्षण मानवी जीवन सुधारू शकते, हा भ्रम आहे. त्यासाठी मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे" याची जाणीव स्वामीजींनी करून दिली.
डॉ. विश्वनाथ कराड आपल्या भाषणात म्हणाले "सदगुणांची पूजा हीच ईश्वर पूजा असल्याची आपली भावना आहे. जीवनात काही आदर्श गरजेचे असतात. छत्रपती शिवाजी महाराज हे असेच सर्वात महान आदर्श आहेत. आमच्या एका पुस्तिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन जगातील सर्वात महान राजा म्हणून केले आहे. महारांजाचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर तो इतरांपर्यंतही पोहोचवला. मोठे कार्य करण्यासाठी विनम्रता, समर्पित भावना आणि शिस्तप्रियता आवश्यक आहे. ती बाबासाहेबांमध्ये पुरेपूर होती" असे डॉ. कराड यांनी नमूद केले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वारकरी पंथाचे कार्य यात साम्य आहे. हे तत्त्वज्ञानच भारत आला विश्वगुरू बनवण्यासाठी पुढे घेऊन जाईल" असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"इतिहास हा कोणत्याही समूह अथवा व्यक्तींचा अपमान करण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी नाही तर सत्याचा संदर्भासहित वेध घेऊन तो निर्भीडपणे कथन करणे, हे इतिहास अभ्यासकाचे काम आहे" असे मत डॉ. केदार फाळके यांनी व्यक्त केले.
"छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ इतिहास म्हणून नाही तर वर्तमान आणि भविष्यासाठी ही मार्गदर्शक आहे. त्यामुळेच बाबासाहेबांनी शिवचरित्राचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जगात पोहोचविले" अशा शब्दात वंजारवाडकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगितली. याप्रसंगी अमृत पुरंदरे आणि प्रदीप रावत यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी, प्रस्तावना अभिषेक जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन राधा पुरंदरे आगाशे यांनी केले. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर शिवराज्याभिषेकाचा नेत्रदीपक प्रवेशही सादर करण्यात आला.
Comments
Post a Comment