चित्रपट तयार करत रहा, यश मिळेल दिग्दर्शक डॅन वॉलमन यांचा नव्या दिग्दर्शकांना सल्ला
पुणे, दि. १९ जानेवारी २०२६ : चित्रपट तयार करण्याचे काम कायम करत रहा, थांबू नका, यश मिळेल, असा सल्ला आज इस्रायलचे दिग्दर्शक डॅन वॉलमन यांनी नव्या स्वतंत्र दिग्दर्शकांना दिला.
पुणे चित्रपट महोत्सवा(पिफ)त आज ‘कमी संसाधनांतून सर्जनशीलतेकडे - नव्या स्वतंत्र दिग्दर्शकांना सल्ला’, या विषयावर डॅन वॉलमन बोलत होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.
डॅन वॉलमन म्हणाले, “कायम करत रहा आणि चित्रपट तयार करत रहा. आपल्याला हवी तशी परिस्थिती तयार होईल, तेंव्हा चित्रपट तयार करू, असा विचार करत बसू नका. कमी खर्चाच्या कथा निवडा. कथा अशीच निवडा की ज्याच्यामध्ये लोकेशन आणि अभिनेत्यांवर जास्त खर्च होणार नाही आणि चित्रपट करण्यापूर्वी कालावधीचा विचार करा.” ते म्हणाले, “जगामध्ये युद्ध, हिंसा, द्वेष सुरू आहेत आणि त्यामुळे निराशा येऊ शकते. मला मात्र त्यातून निराश न होता जिवंत ठेवण्यासाठी सतत चित्रपट तयार करणे, गरजेचे असते.”
ज्यांच्याकडे संसाधनांची कमी आहे, पण ज्यांना चित्रपट तयार करायचे आहेत, त्यांच्यासाठी बायबलमधील दोन शिकाऱ्यांचे उदाहरण देत ते म्हणाले, “थांबू नका. कमी लोकांमध्ये काम करा. मी सहाय्यक ठेवत नाही. त्यामुळे काम जलद होते आणि खर्च कमी होतो.मी प्रसिद्ध नटांपेक्षा चांगले अभिनेते घेतो. ”
ते म्हणाले, की ते न्युयॉर्कमध्ये १९६० च्या दशकात फिल्म मेकिंग शिकले, तेंव्हा अंडरग्राउंड फिल्म चळवळ सुरू होती. स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शकांनी न्यूयॉर्कच्या अंडरग्राउंड फिल्म चळवळीसारखे प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून मोठ्या चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यापेक्षा छोट्या छोट्या ठिकाणी चित्रपट दाखवता येतील.
एआयबद्दलच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की एआयचा वापर कसा करावा याचा विचार करावा लागेल. त्याचा सर्रास वापर करण्यामध्ये खूप तोटे आहेत. चित्रपटात एआयचा वापर केल्याने माणसांना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव कमी होतो.
Comments
Post a Comment