डिजिटल व्यासपीठ आणि छोट्या महोत्सवात स्थानिक चित्रपटांना भविष्य - गोरान राडोवानोविच

पुणे, दि. १८ जानेवारी २०२६ : मोठ्या चित्रपट महोत्सव आणि पुरस्काराच्या मागे लागण्यापेक्षा छोट्या स्थानिक प्रश्नांना घेऊन छोटे चित्रपट केल्यास त्याला भविष्य आहे. त्यावर विचार करा, असा सल्ला आज सर्बियाचे दिग्दर्शक गोरान राडोवानोविच यांनी प्रादेशिक चित्रपट दिग्दर्शकांना दिला. राडोवानोविच यांचे आज ‘प्रादेशिक चित्रपटांसाठी धडे‘ या विषयावर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्याख्यान झाले. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते. 

राडोवानोविच म्हणाले, “कोणत्याही मोठ्या विषयांच्या आणि मोठ्या खर्चिक चित्रपटांच्या मागे लागण्यापेक्षा स्थानिक आणि आपापल्या भागातील स्थानिक प्रश्न आणि कथा घेऊन छोटे चित्रपट तयार करा. त्याला भविष्य आहे. तुम्हाला आवडणाऱ्या आणि समाधान देणाऱ्या विषयांवर चित्रपट तयार करा. पुरस्काराच्या मागे लागू नका. मोठ्या चित्रपट महोत्सवाच्या मागे लागण्यापेक्षा छोटे कलात्मक चित्रपट महोत्सव आणि डिजिटल व्यासपीठ महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणी आपले चित्रपट घेऊन जा. छोट्या देशांमध्ये आपले चित्रपट घेऊन जा. स्वतःची व्यासपीठं तयार करा.” आता रशिया आणि ब्रिक्स देश चित्रपटांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
युरोपातील चित्रपटांविषयी बोलताना ते म्हणाले, की जर कोणत्याही मोठ्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला नाही तर कलात्मक चित्रपटांना युरोपममध्ये सध्या काळ कठीण आहे. चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध ठिकाणी युरोपात निधी उभारण्यात आले आहेत. वेगवेगळे देश एकत्र येऊन चित्रपट तयार करू लागले आहेत. मात्र त्यामध्ये व्यावसायिक विचार जास्त असल्याने खूप चित्रपट तयार झाले पण त्यांना वितरणाची व्यवस्था नव्हती. युरोपियन युनियन मग पुढे आली आणि त्यातून चित्रपटगृहे तयार करण्यात आली. मात्र मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये मोठी नावे असल्याशिवाय किंवा मोठा वितरक असल्याशिवाय प्रवेश मिळणे अवघड होते. त्यामध्येही तुमच्या राजकीय भूमिका पाहिल्या जातात. त्यामुळे स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट, हे छोटे महोत्सव आणि डिजिटल व्यासपीठांकडे वळत आहेत. 

इतिहासात जात त्यांनी सांगितले, की अमेरिकन आणि युरोपियन चित्रपटांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर फारसा फरक नव्हता. इटलीच्या चित्रपटांचे खूप मोठे नाव होते. फ्रेंच न्यू वेव्ह आली. रशियन चित्रपट महत्त्वाचे होते. प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळत होता. चित्रपट हा जगण्याचा एक भाग होता. चित्रपट महोत्सव महत्वाचे होते. त्यातून चित्रपट पुढे येत होते. १९७० मध्ये जर्मन वेव्ह आली. त्यात टेलिव्हिजन वाहिन्यांचा सहभाग होता. मात्र अमेरिकन पॉप संस्कृती आली. व्हिडिओ आले आणि चित्रपटगृहे मागे पडली. चित्रपट एकत्रितपणे पाहण्याचा अनुभव मागे पडला. चित्रपटगृह शॉपिंग मॉलमध्ये उघडले गेले आणि मूळ कलात्मक चित्रपट संस्कृती मागे पडली. 
भारतीय प्रेक्षकांविषयी बोलताना ते म्हणाले, “भारतीय प्रेक्षक खूप शिक्षित आणि संवेदनशील आहेत. ‘कोर्ट’ हा भारतीय चित्रपट युरोपात अतिशय यशस्वी झाल्याचे आणि अनेक छोट्या चित्रपट महोत्सवांमध्येही दाखवला गेल्याचे त्यांनी सांगितले.”

Comments

Popular posts from this blog

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझ्म फेस्टिव्हलजल्लोषात पार पडला