माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती -ब्रम्हर्षी गुरुदेव
पुणे : जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी तर येणारच पण याच अडचणीच तुमची शक्ती वाढवतात. तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रम्हर्षी गुरुदेव यांनी केले.
विश्व धर्म चेतना मंच, पुना, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने पुण्यात आयोजित ‘सिद्धि साधना का महाआशीर्वाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. तब्बल ६८ दिवसांच्या अग्नि महासाधने नंतर ब्रम्हर्षी गुरुदेवांनी उपस्थित भक्तांना जीवनमूल्यांची सखोल शिकवण दिली. यावेळी मंचचे राज्याध्यक्ष उत्तम बाठीया, आयोजक सुमित चंगेडीया,प्रायोजक महावीर बाठीया, प्रितेश कटारिया, संतोष लगडे, राहुल बोगावत ,स्वप्निल गांधी ,भावेश चोरड़िया आदी मान्यवर उपस्थित होते.
कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत ब्रम्हर्षी गुरुदेव म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कौटुंबिक संवाद कमी होत असून कौटुंबिक मूल्ये हरवत चालली आहेत. घरातील संवाद वाढवा. रागासोबत प्रेमही व्यक्त करा. चेहऱ्यावरचे हास्य ही देवाची सर्वोत्तम कलाकृती आहे. ते कायम ठेवा आणि आनंदाने जीवन जगा.
जीवनातील भेदभाव फोल असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “मुंगी आणि हत्तीची तुलना होऊ शकत नाही. मातीत मिसळलेली साखर वेगळी करणे मुंगीला जमते, हत्तीला नाही. प्रत्येक जीवन वेगळे, रहस्यांनी भरलेले आहे. ते रहस्यच जीवनाला अर्थ देते. सुखाच्या मागे धावू नका; जे आहे त्यात आनंद शोधा.
कार्यक्रमाच्या शेवटी मोठ्या संख्येने उपस्थित अनुयायांनी गुरुदेवांचे आशीर्वचन ऐकून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवल्याची भावना व्यक्त केली.
Comments
Post a Comment