केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे फीटल मेडिसिन विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित
पुणे,29 नोव्हेंबर 2025 : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे फीटल मेडिसिन विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसूतीपूर्व निदान, गर्भावस्थेदरम्यान उपचार आणि एक विशेष उदयोन्मुख शाखेच्या रूपात फीटल मेडिसिनचे वाढते महत्त्व यावर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.
परिषदेमध्ये विविध तज्ञांनी लवकर निदान आणि उपचाराचे माता व बाळांवर होणाऱ्या परिणामांविषयी आपली भूमिका मांडली. गर्भवाढीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या,जन्मजात विसंगती,अनुवंशिक विकार आणि प्लासेंटा (गर्भ वेष्टन) च्या कार्यात बिघाड अशा अनेक स्थितींचे निदान लवकर केले जाऊ शकते व त्यावर लक्ष्यित उपचार करत काही बाबतीत जन्माआधी जीवनदायी प्रक्रिया (फीटल प्रोसिजर्स) केले जाऊ शकतात.या राष्ट्रीय परिषदेमध्ये फीटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ञ डॉ.मणिकंदन कृष्णन, मेडिस्कॅन सिस्टिम्स डायग्नोस्टिक अल्ट्रासाऊंड,फीटल मेडिसिन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर,चेन्नई चे संचालक प्रा.डॉ.सुरेश सेषाद्री, प्रख्यात फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.एस.सुदर्शन, केईएम हॉस्पिटल पुणे च्या फीटल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.श्रीपाद कऱ्हाडे यांसह अनेक तज्ञांनी आपले सादरीकरण करत मार्गदर्शन केले. या परिषदेला स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट व फीटल मेडिसिन तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत फीटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ञ डॉ.मणिकंदन कृष्णन, प्रख्यात फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.एस.सुदर्शन, केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी, केईएम हॉस्पिटल पुणे च्या फीटल मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.श्रीपाद कऱ्हाडे आणि फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.श्वेत़ा गुगले यांनी या विषयावर माहिती दिली.
फीटल मेडिसिनमधील प्रख्यात तज्ञ डॉ.मणिकंदन कृष्णन म्हणाले की,फीटल मेडिसिनचा उद्देश प्रतिबंध, असामान्यतांचे निदान,उपचार आणि जोडप्यांना असलेल्या अनेक शंकांचे निरसन करत पाठबळ देणे हे आहे.
प्रख्यात फीटल मेडिसिन तज्ञ डॉ.एस.सुदर्शन म्हणाले की,सर्वांत मोठे आव्हान हे आहे की,अनेक जोडपे पुढील टप्प्यात येतात.चांगले परिणाम मिळण्यासाठी गर्भधारणापूर्वी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, यात जेनेटिक काउन्सिलिंगचा देखील समावेश असू शकतो.
फीटल मेडिसिनबाबतच्या संशोधनाबद्दल बोलताना ते म्हणाले की,या संदर्भात अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे.आम्ही सध्या फीटल मेडिसिनमध्ये एआय वर संशोधन करत असून मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने प्रतिमांचा अभ्यास करता येईल का व हे अल्ट्रासाऊंड मशिनमध्ये अंतर्भूत कसे करता येईल यावर आमचा अभ्यास सुरू आहे.असे झाल्यास प्राथमिक आरोग्य सेवेच्या पातळीवर देखील या समस्या ओळखता येतील व पुढील निदानासाठी तज्ञांकडे त्यांना पाठवता येईल.
केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी म्हणाले की, फीटल मेडिसिनमुळे प्रसूतीपूर्व सेवांमध्ये परिवर्तन घडत आहे. लवकर व अचूक निदानामुळे प्रसूतीपूर्व कालावधीतील आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. प्रत्येक गर्भवती मातेला उच्च दर्जाची व पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा मिळावी यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
प्रगत आरोग्यसेवा क्षेत्रात फीटल मेडिसिन ही एक झपाट्याने विकसित होणारी वैद्यकीय शाखा असून बाळाच्या जन्मापूर्वी विविध स्थितींचे लवकर निदान, देखरेख व व्यवस्थापनावर केंद्रित आहे. अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञान आणि फीटल इमेजिंगमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे वैद्यकीय तज्ञ पहिल्या तिमाहीतच विकासात्मक विसंगतींचे निदान करू शकतात. यामुळे उच्च जोखमीच्या प्रसूतींबाबत योग्य तयारी करता येते.
केईएम हॉस्पिटल पुणे मधील फीटल मेडिसिन विभाग हा व्यापक प्रसूतीपूर्व सेवा प्रदान करण्यात अग्रणी राहिला आहे. या विभागातर्फे प्रगत अल्ट्रासाऊंड चाचण्या,फीटल इकोकार्डिओग्राफी, डॉपलर चाचणी, जेनेटिक काउन्सिलिंग व उच्च जोखमीच्या प्रसूतींसाठी या सर्व सोयींसह समन्वित आरोग्य सेवा प्रदान करत आले आहे. फीटल मेडिसिन तज्ञ, नवजात शिशू तज्ञ, अनुवंशशास्त्र तज्ञ व प्रसूती तज्ञ या बहुशाखीय टीमद्वारे गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत अचूक निदान, प्रगत व अखंड सेवा प्रदान केल्या जातात.
गर्भावस्थेदरम्यान गर्भामधील उद्भवणाऱ्या काही स्थितींच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी, तसेच या परिस्थितींवर उपचार केले जाऊ शकतात, ही माहिती देखील असावी यावर डॉ.श्रीपाद कऱ्हाडे व डॉ.श्वेता गुगले यांनी भर दिला.यामधील उपचार पर्याय हे गुंतागुंतीचे असतात आणि याला प्रगत कौशल्याची आवश्यकता असते. यासाठी व्यापक प्रशिक्षण,मार्गदर्शन व रूग्णालयात बहुविद्याशाखीय तज्ञांची गरज असते.
या परिषदेचे नेतृत्व कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.विवेक जोशी, सचिव डॉ.श्रीपाद कऱ्हाडे आणि डॉ.श्वेता गुगले यांनी केले असून एका अनुभवी वैज्ञानिक समितीचे त्यांना पाठबळ मिळाले.
Comments
Post a Comment