माई समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात - कृष्ण प्रकाश यांचे प्रतिपादन

पुणे : “माईंना मी पहिल्यांदा नांदेड येथे भेटलो. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील त्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणाने मी अत्यंत प्रभावित झालो. त्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा मी सखोल अभ्यास केला. जीवनात अनेक अडचणी आणि संकटे असतानाही माईंनी कधीही नकारात्मकता अंगीकारली नाही. त्यांच्या कार्याच्या पाठीशी सकारात्मक विचारांची आणि अपार जिद्दीची अमूल्य शक्ती होती. त्यांनी अर्जुनाप्रमाणे ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःचे दुःख विसरून इतरांसाठी आयुष्य अर्पण केले. म्हणूनच त्या समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात,” असे प्रतिपादन अप्पर पोलीस महासंचालक फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख कृष्ण प्रकाश यांनी केले.

'सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, मांजरी तर्फे पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या वाढदिवस व बालदिनाच्या औचित्याने ‘माई दिनदर्शिका-2026’ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्ण प्रकाश बोलत होते. कार्यक्रमास मनिष कासोदेकर (लेटर्स अँड स्पिरिट आर्ट क्लब), ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड, दि मदर ग्लोबलचे अध्यक्ष विनय सपकाळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांचे भवितव्य घडवले. त्यांच्याकडे कोणतेही पद, सत्ता किंवा राजपाट नव्हता; पण समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आदर्श राजासारखी त्यांची सेवा होती. एका हाताने घेतलेले दुसऱ्या हाताला देत राहण्याचा त्यांचा जीवनमार्ग होता. जसे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित होतो, तसे माईंनी हजारो आयुष्ये उजळवली. त्यांच्या प्रेरणेने अनेकजण कार्यरत होतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.”

मनिष कासोदेकर म्हणाले, “या ‘माई दिनदर्शिका’ निमित्त आम्हाला माई परिवाराशी जोडले जाण्याचा आनंद आहे. आम्ही व्यावसायिक हेतू न ठेवता केवळ समाधानासाठी कार्य करत आहोत. ममता ताईंच्या माध्यमातून आम्ही माईंना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माईंचा विशाल प्रवास केवळ 12 पानांत मांडणे हे मोठे आव्हान होते. माईंचे फोटो सर्वत्र आहेत; पण आम्ही यामध्ये त्यांच्या विचारांचा वेगळा आणि अर्थपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ममता सपकाळ म्हणाल्या, “माझ्या आईने जे भोगले ते तिच्या नशिबात होते; पण असे प्रसंग कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत म्हणून ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभी राहिली. जगातील प्रत्येक अनाथ व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना आधार देण्याचा तीने शेवटपर्यंत प्रयत्न केला. आज माई आपल्यात नसल्या तरी त्यांच्या संस्था आम्ही भावंडे चालवत असून अधिक मोठ्या करत आहोत. त्यामुळे तिचा वाढदिवस आम्हाला ‘जयंती’ वाटत नाही—कारण संस्था म्हणजेच आमच्या आईचे जिवंत अस्तित्व. बालदिन आणि माईंचा वाढदिवस यांचा एकाच दिवशी योग येणे हे निश्चितच विशेष आहे.”

माई पब्लिकेशन च्या वतीने ‘माई दिनदर्शिका -2026’ प्रकाशित केली असून या दिनदर्शिकेच्या विक्रीतून येणारा संपूर्ण नफा माईंच्या संस्थेतील मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भडांगे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! १२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न