अमेय डबलींच्या आध्यात्मिक संगीताने पुणेकरांना दिला दिव्यतेचा अनुभव

पुण्यातील प्रतिष्ठित बंटारा भवनमध्ये अलीकडेच एक मंत्रमुग्ध करणारा अध्यात्मिक संगीतमय सोहळा साकारला गेला, जेव्हा बहुपरिचित गायक, संगीतकार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अमेय डबली यांनी “कृष्णा: म्युझिक, ब्लिस अ‍ॅन्ड बियॉन्ड” या त्यांच्या अद्वितीय कॉन्सर्ट सिरीजचं पुणे सादरीकरण साजरं केलं. ही सिरीज देशातील सर्वात भव्य आणि हृदयस्पर्शी आध्यात्मिक संगीत यात्रांपैकी एक मानली जाते. या निमित्ताने, पुणेकरांनी भक्ती, संगीत आणि शांती यांचा एकत्रित अनुभव घेतला ते देखील बँडच्या सादरीकरणासह!

दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात, अमेय डबलींनी श्रोतृवर्गासमोर एक वेगळंच अध्यात्म उभं केलं. जे विधी-नियमांपलीकडे जात, आनंदात, संगतात, आणि सामूहिक ऊर्जेतही सापडतं. पुणेकर रसिक प्रत्येक क्षणी सहभागी होत होते. कुणी ध्यानात मग्न, कुणी कृष्णनामात रंगलेलं, तर कुणी नादब्रह्माच्या लयीत आनंदाने नाचत होतं. या काही तासांमध्ये उपस्थितांनी संपूर्णपणे वर्तमानात जगत, तणाव बाजूला ठेवून शुद्ध आनंद अनुभवल्याचं चित्र स्पष्ट होतं.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेय डबलींनी अध्यात्म आणि त्याच्या व्यापकतेविषयी सांगितलं की, “धर्म आणि अध्यात्म यांचं नेहमीच गोंधळ होतो. हे एकमेकांसोबत चालू शकतात, पण ते समान नाहीत. धर्म आपल्याला आचारशुद्धी शिकवतो, तर अध्यात्म आपल्याला आत्मशुद्धीचा मार्ग दाखवतं आणि याच्या मधोमध असतं संगीत ज्याला कुठलाही धर्म लागत नाही. संगीत थेट आत्म्याशी संवाद साधतं. 'कृष्णा' म्हणजे अशाच त्या संवादाची, त्या अनुभवाची, एक सजीव अभिव्यक्ती आहे. पुणेकरांनी ही ऊर्जा उरात सामावून घेतली, हे पाहून मन भरून आलं. पुढच्या वेळेस हे नातं अधिक घट्ट होईल, याची मला खात्री आहे.”

'कृष्णा' ने पुन्हा एकदा सिद्ध केलं की आजचं अध्यात्म म्हणजे संन्यास नव्हे, तर उत्सव आहे. आत्म्याच्या आनंदाचा, जीवनाशी जोडलेपणाचा आणि संगीताच्या माध्यमातून ईश्वराशी नातं घट्ट करणारा अनुभव.अमेय डबली आणि त्यांच्या 'साउंड्स फॉर द सोल' टीमने पुण्यात साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे एक शुद्ध, पवित्र आणि ऊर्जा देणारा क्षण. जो अनेक पुणेकरांच्या मनात दीर्घकाळ राहील.

Comments

Popular posts from this blog

२८ नोव्हेंबरला मिळणार ‘बॅक टू स्कूल’च्या आठवणींना उजाळा

डॉ. विश्वनाथ कराड यांना श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार प्रदान

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न