नीलम गोऱ्हे,रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांना नवी उभारी
पिंपरी: ‘पिंची’ हा पिंपरी -चिंचवड मधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे, यांनी आयोजित केलेला मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे आयोजन पिंचीच्या संस्थापक पूनम परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पारंपरिक फुगड्या, झिम्मा, उखाणे, लोकनृत्य आणि गाण्यांनी सजलेला हा स्नेहमेळावा हरवत चाललेल्या मंगळागौरीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला.
या कार्यक्रमात महिलांना संबोधन करतांना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “हा स्नेहमेळावा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर स्त्रीशक्ती, आपुलकी आणि परंपरांचा सन्मान होता. 'पिंची'च्या या उपक्रमामुळे पारंपरिक खेळांना आणि सांस्कृतिक समृद्धतेला मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “अशा कार्यक्रमांमधून महिलांची सृजनशीलता, एकजूट आणि संस्कृतीवरील प्रेम प्रकर्षाने जाणवतं. पूनम परदेशी आणि पिंची टीमचे कार्य खरंच प्रेरणादायक आहे.” या समूहातील सुमारे ३०,००० महिलांच्या सहभागामुळे, ‘पिंची’ने सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमधून पुन्हा एकदा आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली.
Comments
Post a Comment