Dr. शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र
अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद असणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे हे दोन उत्तम कलावंत प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडलेले आणि प्रामुख्याने मराठी रंगभूमीवर सक्रिय असणारे हे दोन कलावंत आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटात दिसणार आहेत.
व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी चित्रपटातील नावाजलेले अभिनेते. कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या हौशी नाट्य संस्थेतर्फे ते १९८२पासून दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’, ‘जोतिबा फुले’, तसेच ‘आईनस्टाईन’ यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेऊन ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आईची गोष्ट’, ‘द मदर‘, ‘द घरवाली’ या आपल्या नाटयकृतींमध्ये स्त्री-सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या सर्जनशील कलावंत म्हणून अभिनेत्री सुषमा देशपांडे ओळखल्या जातात. ‘घरत गणपती’ या चित्रपटात हे दोघे आजी आणि आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कुटुंबप्रमुख असलेले ‘आप्पा’ आणि ‘माई’ यांची महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारताना दिसणार आहेत.
आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या प्रेमळ नात्याची गोष्ट प्रेक्षकांना ‘घरत गणपती’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एकत्र कुटुंबात आजी आणि आजोबा कशी समन्वयाची भूमिका पार पाडतात? आणि तुटणा-या नात्याचे बंध कसे जोडून ठेवतात, याचे भावनिक आणि मार्मिक चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे. कौंटुबिक मूल्यांची आठवण करून देणारा ‘घरत गणपती’ चित्रपट हसवता हसवता प्रत्येकाला अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघेही व्यक्त करतात.
या दोघांसोबत निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
Comments
Post a Comment