समाजाला जोडण्याचे काम ' आभाळ ' चित्रपट करेल - ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे मत
कथा, कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे. भारतीय समाजाचे मन चित्रपटसृष्टीने घडविले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आज समाजात दुही निर्माण करणे, महापुरुषांना जातीच्या आधारावर विभक्त करण्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे शौर्यगीत असलेला ' आभाळ ' हा मराठी चित्रपट समाजाला जोडण्याचे काम करेल असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी शनिवारी व्यक्त केले.
'युगांतर फिल्म्स प्रा. लि.' निर्मित व पांडव एंटरप्रायजेस प्रस्तुत 'आभाळ' या मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा आणि याच चित्रपटातील शिवशक्ती- भीमशक्तीतील सामर्थ्य प्रकट करणारं शौर्यगीत प्रकाशन सोहळा पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडला यावेळी श्रीमंत कोकाटे बोलत होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रमोद अंबाळकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे दिग्दर्शक रवी रोकडे, पटकथा व संवाद लेखक राज काझी आदी मान्यवर उपस्थित होते. आज प्रकाशित करण्यात आलेले गीत शुभम तालेवार यांनी लिहिले असून श्रेयसराज आंगणे यांनी संगीतबद्ध केले आहे.
पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एक सारखे आहे, शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तर बाबासाहेबांनी संविधान लिहिले, एकाने मध्ययुगात माणसाला समान जगण्याचे अधिकार देण्यासाठी तलवार उचलली तर दुसऱ्याने लेखणी उचलली,परिस्थिती आणि काळाचे अंतर बघितले तर आपल्याला त्यांच्या महान कार्याची जाणीव होते. स्वराज्यात माणसाचे जीवन सुसह्य होते त्याचे कारण शिवाजी महाराज यांचे कायदे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान जगण्याचे अधिकार दिले आहेत. शिवराय व भीमराय या दोघांच्याही मध्ये निर्व्यसनी, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी असे अनेक समान धागे आहेत, आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी.मनोरंजन विश्वाचा समाजावर मोठा पगडा असल्याने या क्षेत्रातील मान्यवरांची जबाबदारी आहे की त्यांनी मनोरंजन करताना सामाजिक भान जपले पाहिजे.
मेघराज राजेभोसले म्हणाले, देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत. अशा काळात 'आभाळ' मधील शिवशक्ती - भीमशक्ती चा वारसा सांगणारे शौर्यगीत समाजाला एकत्र आणण्याचे काम करेल. सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते असे हा चित्रपट सांगतो, गाण्यातून सुद्धा एक सकारात्मक संदेश निर्मात्यांनी दिला आहे.
प्रास्ताविक करताना निर्माते डॉ. प्रमोद अंबाळकर म्हणाले , चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. हल्ली प्रेक्षक कमी झाल्याचे म्हटले जाते मात्र प्रेक्षक का कमी झाले याचा विचार करायला हवा. आम्ही आभाळ ची निर्मिती कोणत्याही व्यावसायीक दृष्टीकोनातून केलेली नाही, मनोरंजनातून समाज प्रबोधन हा आमचा हेतू आहे.
राज काझी, रवी रोकडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी नितीन यांनी केले.
Comments
Post a Comment