मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर
२०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. 'ख्वाडा', 'बबन', 'टीडीएम' अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार आहेत. आपल्या आगामी ‘फकिरा’ या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नुकतीच केली. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत. विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि च...