तंत्रज्ञान बदलले तरी चित्रपट महोत्सवकायम राहतील – गौतम घोष
तंत्रज्ञान कितीही बदलले तरी चित्रपट महोत्सव कायम राहतील, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गौतम घोष यांनी व्यक्त केले. पुणे येथे सुरू असलेल्या २२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी राष्ट्रीय घोष यांची मुलाखत घेतली.
घोष म्हणाले, “आता ओटीटीचे तंत्र आले आहे. त्यामुळे चित्रपट महोत्सवात येऊन चित्रपट कोण पाहणार असा प्रश्न काहीजण उपस्थित करतात, मात्र हे खरे नाही. लोक एकत्रीतपणे हसतात, रडतात. लोकांना चित्रपटाचा एकत्रीत अनुभव केवळ चित्रपट महोत्सवांमध्ये मिळतो. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी बोलताना घोष म्हणाले, की हा एक वेगळा महोत्सव आहे. कारण इथला प्रेक्षक वेगळा आहे. या महोत्सवामध्ये अभ्यासात्मक कार्यक्रम होतात आणि उच्च दर्जाचे चित्रपट असतात. त्यामुळे हा महोत्सव महत्त्वाचा आहे.
घोष म्हणाले, चित्रपट ही कला शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून जन्माला आली आहे, त्यामुळे त्यामध्ये तांत्रीक बदल सातत्याने होत राहणार आहे. पूर्वी १६ मी.मी. फिल्मवर चित्रपट केले जायचे, ते तंत्र बदलले आणि व्हिडीओ तंत्र आले पुढे डिजिटल तंत्र आले. मात्र चित्रपटाने या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या. कारण चित्रपट तयार होतानं कॅमेऱ्यामागची दृष्टी महत्त्वाची असते. या सगळ्यामध्ये बाजारपेठ महत्त्वाची असते आणि त्याचा एक दबावही असतो. बाजारपेठ जे म्हणेल, त्यानुसार बदल घडत जातात.
घोष पुढे म्हणाले, “कॅमेऱ्याच्या मागचा जो व्ह्यू फाईंडर असतो, तो महत्त्वाचा असतो. त्यामधून दिसणारी फ्रेम चांगली, वाईट, कशीही असो, ती तुमची फ्रेम असते. त्यातून तुम्ही जग बघत असता. त्यामुळे छायाचित्रकार आणि दिग्दर्शक एक असला आणि वेगवेगळा असला, की फरक पडतो.” ते म्हणाले, की ते जेंव्हा इतर दिग्दर्शकांसाठी छायाचित्रण करत असतात, तेंव्हा तेच दिग्ददर्शकाच्या भूमिकेमध्ये बऱ्याचवेळेला जातात.
Comments
Post a Comment