चाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी
जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. मोरया प्रॉडक्शन्स, भूमिका थिएटर्स, अथर्व थिएटर्स निर्मित, जाई काजळ प्रस्तुत 'पुरुष' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले असून येत्या १४ डिसेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. राजन ताम्हाणे दिग्दर्शित, जयवंत दळवी लिखित या नाटकाचे शरद पोंक्षे, श्रीकांत तटकरे, समिता भरत काणेकर निर्माते आहेत. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत दिसतील. या नाटकाला विजय गवंडे यांचे संगीत लाभले आहे. स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य...